संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र, हरंगुळ (बु) येथे मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत बहुविकलांग मुलांच्या हँडबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. बहुविकलांग मुलांनी व्हील चेअरवरुन हँडबॉल खेळण्याचा आनंद लुटला. या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन श्री. महेंद्रकुमार पुलवाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ब्ल्यु क्रॉस कंपनी, मुंबई, श्रीमती सोनाली दास, सामाजिक कार्यकर्त्या, हरंगुळचे ग्रामसेवक श्री. आनंद मडके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. उदघाटनाचे प्रास्ताविक प्रकल्पाचे सहकार्यवाह डॉ. योगेश निटुरकर यांनी केले. यावेळी जनकल्याण निवासी विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सामुहिक गीत गायले. संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह श्री सुरेश पाटील यांनी दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहता कामा नये. निवडणूक आयोगानी दिव्यांगांसाठी मतदान करण्याकरिता अडथळा विरहीत मतदान करण्याची व्यवस्था केलेली आहे, असे प्रतिपादन केले.
बहुविकलांग विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेमध्ये काळजीवाहक म्हणून जनकल्याण निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच सामान्य विद्यार्थी व विशेष विद्यार्थ्यांनी खेळण्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमास जनकल्याण निवासी विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री. प्रदिप मुसांडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. क्रीडा स्पर्धेस संवेदना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील यांच्यासह जनकल्याण विद्यालयातील शिक्षक, पर्यवेक्षक, संवेदनातील कर्मचारी, पालक, सक्षमचे श्रीराम शिंदे, श्री. बस्वराज पैके श्री. आनंद पाठक यांनी मेहनत घेतली.