संवेदना प्रकल्पाचा वर्धापन दिन संपन्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचलित, संवेदना बहुविकलांग विद्यार्थ्यांचा 19 वा वर्धापन दिन व वार्षिक अंक प्रकाशन सोहळा दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी हरंगुळ (बु), लातूर येथील प्रकल्पस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. श्री. संजय शिवपुजे (हृदय रोग तज्ञ, लातूर) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. सौ. स्नेहल शिवपुजे (मधुमेह तज्ञ, लातूर) ह्या होत्या. त्यांनी आपल्या भाषणात संवेदना शाळेत विशेष शिक्षण, विविध थेरपी या ठिकाणची पाहुन मी प्रभावित झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेषत: सीपी, बौध्दीकदृष्ट्या दिव्यांग, ऑटीझम अथवा बहुविकलांग विद्यार्थ्यांना शिकवणे हे साधे, सोपे काम नाही. आजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे गीत गायिले व नृत्य सादर केले ते पाहुन मन भरुन आले. या शाळेत सकारात्मकता पहायला मिळते. येथे कार्य करणारे जे शिक्षक आहेत, त्या सर्वांचे मनापासुन कौतुक करते. या शाळेतील जे काळजीवाहक आहेत, ते दिव्यांग विद्यार्थ्यांना ज्या आत्मियतेतुन बोलत होत्या, प्रत्येक विद्यार्थ्यांची, प्रत्येक काळजीवाहक मायेने काळजी घेत आहेत. ही बाब मोठी तितकीच महत्वाची आहे. आज एका चांगल्या प्रेरणा देणाऱ्या शाळेस भेटता आले, त्याचा आम्हाला आनंद आहे. शाळेस आमच्या हार्दिक शुभेच्छा देते . विद्यार्थी , पालक यांना आमची वैद्यकीय मदत लागली तर आम्ही सदैव उपलब्ध असुत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे अध्यक्ष अँड. श्रीराम देशपांडे यांनी केले. मागील 18 वर्षांचा थोडक्यात आढावा घेऊन ते म्हणाले की, समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांसाठीच कार्य करण्यासाठी रा. स्व. संघ जनकल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानुसार संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातुन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व आरोग्याची सेवा या ठिकाणी होत असल्याचे नमूद केले. वार्षिक अंकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले. अंकाच़े संपादक तथा प्रकल्पाचे कार्यवाह डॉ. श्री. योगेश निटुरकर यांनी अंकामधील लेखांची, वर्षभर झालेल्या विविध कार्यक्रमांची माहिती अंकामध्ये दिली आहे. अध्यक्षीय भाषण डॉ. श्री. संजय शिवपुजे यांनी केले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गेल्या अनेक वर्षापासुन सातत्याने, या ठिकाणचे काम पाहुन संस्थेचे कौतुक वाटते. या कार्यास मन:पूर्वक शुभेच्छा. मा. अध्यक्ष डॉ. श्री. संजय शिवपुजे यांचे स्वागत प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. श्री. राजेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन फिजिओथेरपिस्ट डॉ. सौ. मयुरी बिल्लावार तर आभार मुख्याधापिका सौ. दीपा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यार्थ्यांच्या देशभक्ती पर व स्वागत गीतांनी झाला. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्यामार्फत नव्याने सुरु करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या संगीत विषयातील विशेष अभ्यासक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी गायन व वादन (हार्मोनिय) या विषयांमध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन केले, अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच वय वर्ष 14 - 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तुंचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास ITI चे कार्यवाह श्री प्रवीण सगर, श्री विठ्ठल गाडेकर, श्री सुरेशदादा पाटील, श्री दिगंबर माळवदे, श्री वैजीनाथ व्हनाळे, पालक यांची उपस्थिती होती.
08/11/2025