लातूर येथे थॅलेसेमिया जनजागृती अभियान कार्यशाळा संपन्न दि. 24/8/25 रविवार रोजी लातूर येथे थॅलेसेमिया जनजागृती अभियान कार्यशाळा संपन्न झाली. थॅलेसेमिया या आजाराची गंभीर स्थिती लक्ष्यात घेता थॅलेसेमिया आजाराबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने लातूर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वी संसर्गजन्य साथीचे आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचे त्यामुळे थॅलेसेमिया सारख्या दुर्मिळ आजाराकडे दुर्लक्ष व्हायचे व निदान सुद्धा होत नव्हते. सध्या जागतिक आरोग्य संघटना व शासनाच्या धोरणानुसार उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेह निदान, उपचार व जनजागृती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. थैलेसिमिया, हिमोफिलिया व सिकल सेल अनेमिया याकडे फार कमी लक्ष जाते. त्यामुळे या विषयांकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. हे रक्त विकारावर कायमस्वरूपी उपचार नाही; काही अपवादात्मक थॅलेसेमिया ग्रस्त व्यक्तींमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट (BMT) हा एक पर्याय असू शकतो त्यामुळे काळजी व प्रतिबंधात्मक उपाय योजना ह्या अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना थॅलेसिमिया आहे त्यांना शुद्ध रक्त पुरवठा करणे, त्यांचे व पालकांचे समुपदेशन करणे, प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे व समाजाला जागृत करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे असे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ राजेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात मत व्यक्त केले. बालरोग तज्ञ डॉ दीपक दाडगे यांनी थॅलेसेमिया आजाराचे लक्षण, निदान, प्रतिबंधात्मक उपाययोजना या बाबत मार्गदर्शन केले. थॅलेसेमिया हा एक आनुवंशिक रक्ताचा विकार आहे, ज्यामध्ये शरीरात हिमोग्लोबिन (रक्तातील लाल रंग देणारे प्रथिन) तयार होण्याची क्षमता कमी होते. यामुळे लाल रक्तपेशी कमी तयार होतात आणि शरीरात अनेमिया (रक्तदाबाचा अभाव) निर्माण होतो. अल्फा थॅलेसेमिया, बीटा थॅलेसेमिया, थॅलेसेमिया मायनर, थॅलेसेमिया इंटरमिजिएट आणि थॅलेसेमिया मेजर या बाबत माहिती दिली. तसेच नियमित रक्त चढवणे, लोहतत्त्व काढण्यासाठी औषधे आणि काही प्रकरणांत अस्थिमज्जा प्रत्यारोपण यशस्वी होऊ शकते असे मत व्यक्त केले. पालक हे थॅलेसेमिया वाहक असू शकतात त्यामुळे रक्त तपासणी आवश्यक आहे. संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना तसेच यकृत (Liver) व प्लीहा (spleen) वरती सूज आल्याने प्लीहा काढण्याची गरज काही वेळेस भासते असे डॉ दाडगे यांनी मत व्यक्त केले. वारंवार रक्त चढवल्याने शिरारतील महत्वाच्या अवयवावर नकारत्मक परिणाम म्हणजेच complications होतात असे सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूरचे अध्यक्ष डॉ अभय कदम यांनी रक्त तपासणी बाबत चे महत्व व थॅलेसेमिया प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यासाठी अभियान राबविण्यात येईल असे प्रतिपादन केले. थॅलेसेमिया रुग्णांच्या जन्माचा टक्का खाली येणे, त्यांना सुरक्षित रक्ताची उपलब्धता होणे, त्यांना आवश्यक उपचार सहज उपलब्ध होण्यासठी सगळ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र चे प्रांत समन्वयक डॉ आशुतोष काळे यांनी मत व्यक्त केले. थॅलेसेमिया रुग्णांना कायम शुद्ध, ताजं रक्त उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यासाठी थॅलेसेमिया व्यक्ती साठी रक्त दाता साखळी निर्माण करणे आवश्यक आहे म्हणजेच रक्तदात्यांनी एक थॅलेसेमिया रुग्ण दत्तक घेतले पाहिजे. जेणेकरून थॅलेसेमिया रुग्णांना ठराविक रक्तदाते मिळतील व रक्त दात्यामध्ये थॅलेसेमिया ग्रस्त व्यक्ती बद्दल सहवेदना जागृत होईल. एका थॅलेसेमिया रुग्णाला जन्म झाल्यापासून ते साधारण २५-३५ वयापर्यंत हजारो वेळेस इंजेक्शनची सुई टोचावी लागते. त्याच बरोबर रक्त तपासणी, वैद्यकीय सल्ला, औषोधोपचार, प्रवास, इ. वरती लाखो रूपये खर्च होतात. जनुकीय उपचार व जनुकीय एडिटिंग सारख्या उपचार पद्धती साठीचा खर्च करोडो रुपयांच्या आहे. जे कि आपल्या सारख्या देशात अशक्य आहे. त्यामुळे प्रतीबंधात्मक उपचार, रक्त तपासणी अनिवार्य करणे, काळजी, जनजागृती आणि प्रतिबंध यावर काम करणे फार महत्वाचे आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक. गर्भवती महिला, काही ठराविक धर्मात जवळच्या नातेवाईकांसोबत विवाह इ. चे प्रबोधन होणे अवश्यक आहे. विवाहपुर्वी किंवा शस्त्रक्रिये पूर्वी HIV रक्त तपासणी ज्याप्रमाणे अनिवार्य असते त्याप्रमाणे थॅलेसेमिया रक्त तपासणी करणे अनिवार्य केल्यास येणाऱ्या काळात थॅलेसेमिया मुक्त भारत हे सहज शक्य होईल. १९७० च्या काळात साडे सहा लक्ष लोकसंख्या असलेल्या सिप्रस सारख्या देशात त्यांच्या धर्मगुरूंच्या सांगण्यावरून थॅलेसेमिया मुक्त झाला. आपल्या कडे आज असे काही होण्यासाठी CCC (Care-Cure-Curb) आणि CAP (Care-Awareness-Prevention) संकल्पना राबवणे आवश्यक आहे. संवेदना प्रकल्पाचे संस्थापक कार्यवाह व सक्षमचे राष्ट्रीय सह सचीव श्री सुरेश पाटील यांनी थॅलेसेमिया हा आजार फक्त एका व्यक्ती किंवा कुटुंबापुरता मर्यदित विषय नाही; तो पूर्ण समाजाचा विषय असून त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय करणे अवश्यक आहे. ही कार्यशाळा आपण का आयोजित केली? आपल्या घरात, शेजारी किंवा परिचित व्यक्ती हा थॅलेसेमिया ग्रस्त नसताना सुद्धा आज आपण सगळेजण या थॅलेसेमिया विषयावर चिंतन व विचार विनिमय करण्यासाठी एकत्र आलो आहोत; कारण थॅलेसेमिया ही सामाजिक जबाबदारी आहे असे आपल्या सगळ्यांना वाटत असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ नवाब जमादार यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये थॅलेसेमिया विषयात समर्पण भावनेने काम करून यावर सगळ्यांनी काम केल्यास यश मिळेल असे मत व्यक्त केले. थॅलेसेमिया हा वर्षानुवर्ष चालू असलेला आजार आहे, पूर्वी निदान होत नव्हते, आता विज्ञानाची प्रगती झाली आहे त्यामुळे निदान होत आहे; त्याचबरोबर उपचार ही सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे पूर्वी रक्त उपलब्धता नसायची आता रक्त संकलनही वाढले आहे. रक्तदान मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे होत आहे त्यामुळे थॅलेसिमिया ग्रस्त व्यक्तींना डॉ भालचंद्र ब्लड बँके सारख्या रक्त केंद्रातून नियमित रक्त उपलब्ध होत आहे. त्यांच्यावर उपचार सुद्धा होऊ लागले आहेत. अश्या प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन होणे थॅलेसेमिया मुक्त लातूर साठी उपयोगी होऊ शकते असे मत व्यक्त केले. आभार प्रदर्शन व आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. भालचंद्र रक्तपेढीचे अध्यक्ष तथा जेष्ठ बालरोग तज्ञ डॉ मन्मथ भातांब्रे यांनी डॉ भालचंद्र ब्लड बँकेचे इतिहास, समाजाप्रती असलेली जबाबदारी, कार्यविवरण तसेच येणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी थॅलेसेमिया बाबत प्रभात फेरी द्वारे काळजी, जनजागृती व प्रतिबंध याबाबत प्रचार प्रसार करू आणि थॅलेसेमिया मुक्त लातूरचे लातूर पॅटर्न निर्माण करू असे सकारत्मक मत व्यक्त केले. थॅलेसेमिया आव्हानांवर सर्वांनी एकत्र विचार विनिमय करण्यासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, (DDRC) लातूर कार्यान्वित अभिकर्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचलित संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु) लातूर, इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित डॉ. भालचंद्र रक्तपेढी, लातूर, समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ (सक्षम), लातूर, विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, लातूर, इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया कार्यशाळेचे आयोजन रुग्णसेवा सदन, विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटल, लातूर येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये लातूर जिल्ह्यातील एकूण ६० संस्थेतील १५० जणांनी सहभाग घेतला. एकूण ५० सहभागी विद्यार्थ्यांनी थॅलेसेमिया निदानासाठी रक्त तपासणी करून थॅलेसेमिया मुक्त लातूर करण्याच्यादृष्टीने पाऊल उचलेले. या कार्यशाळेत काळजी, उपचार व प्रतिबंधात्मक उपाय यावर गटश: चर्चा झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलास आराध्ये यांनी केले. या कार्यशाळेमध्ये जिल्हा दिव्यांग सशक्तीकरण अधिकारी श्री राजू गायकवाड, विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष श्री अनिल अंधोरिकर, सह-कार्यवाह डॉ राधेश्याम कुलकर्णी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर, डॉ भालचंद्र रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. योगेश गावसाने, सक्षम चे जिल्हा अध्यक्ष डॉ बाळासाहेब चव्हाण, श्री दीपक क्षीरसागर, सौ प्रीती पोहेकर, संवेदना शाळेचे विशेष शिक्षक श्री. व्यंकट लामजाने, श्री योगेश्वर बुरांडे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे व्यवस्थापक श्री बस्वराज पैके आणि विशेष शिक्षिका सौ शीतल सूर्यवंशी उपस्थित होते. कार्श्रीयशाळा यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी श्री सुजित बोर्सुरीकार, श्री संतोष खटोल, श्री रत्नेश्वर बडे, श्री संतोष कोळगावे, श्री संतोष डाळिंबे, सौ अन्नपूर्णा बंनछरे व श्री सोमनाथ ब्याकुडे यांनी परिश्रम घेतले.
08/11/2025