स्वमग्नता असलेल्या मुलांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज - एस. गोविंदराज* • संवेदना प्रकल्पात स्वमग्नता दिनानिमित्त कार्यशाळा • विविध तज्ज्ञांनी केले स्वमग्नतेविषयी मार्गदर्शन लातूर, दि. ४ : ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता हा दिव्यांगत्वाचा एक प्रकार सध्या लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. लवकर निदान आणि वेळीच उपचार करून या दिव्यांगत्वाची तीव्रता कमी करता येते. स्वमग्नता असलेल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा बौद्धिक व मानसिक विकास साधण्यासाठी पालक, समाज यांच्या विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे केंद्र सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाचे आयुक्त एस. गोविंदराज यांनी आज येथे सांगितले. जागतिक स्वमग्नता दिनानिमित्त संवेदना प्रकल्पात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सक्षम देवगिरी प्रांत आणि जिव्हाळा पालक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. गोविंदराज बोलत होते. यावेळी राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त मा.प्रवीण पुरी, , समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर आणि उमंग इन्स्टिट्यूटचे डॉ. प्रशांत उटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. लवकर निदान आणि नियमित उपचारांमुळे कोणत्याही प्रकारच्या दिव्यांगत्वाची तीव्रता कमी होऊ शकते. स्वमग्नता असलेल्या मुलांना सुरुवातीच्या काही वर्षांत चांगले उपचार आणि योग्य शिक्षण दिल्यास त्यांची स्वमग्नता कमी होऊन ते सामान्य जीवन जगू शकतात. त्यांच्यातील कलागुण आणि कौशल्यांना चालना देण्यासाठी शासन, प्रशासनासह समाजाच्या सहभागाची आवश्यकता आहे. दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना समाजातील विविध संस्था आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. गोविंदराज यांनी केले. गर्भवती महिलांचा आहार आणि मानसिक स्थिती यांचा परिणाम मुलांमध्ये दिव्यांगत्व निर्माण होण्यावर होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांना सकस आहार आणि मानसिक संतुलन राखण्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. लवकर निदान आणि उपचारांमुळे स्वमग्नतेची तीव्रता कमी होते. त्यामुळे या दिव्यांगत्वाची लक्षणे, कारणे आणि उपचार यांविषयी समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे. संवेदना प्रकल्पातील याविषयीच्या कार्यशाळेमुळे याबाबत जाणीव निर्माण होईल, असे मत राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनी व्यक्त केले. राज्य शासन दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा चालवते. देशात अशा शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. याशिवाय, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि विविध उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांग कल्याणासाठी संवेदना प्रकल्पातून होणाऱ्या कामाचे कौतुक करत श्री. पुरी सर म्हणाले की, येथे दिव्यांगांसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणामुळे दिव्यांगांच्या कौशल्यांचा विकास होऊन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील. दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात न्यूरोफिजिशियन डॉ. देवाशिष रुईकर यांनी स्वमग्नता म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि उपचार यांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर रिहॅबिलिटेशन सायकोलॉजिस्ट किर्तीसुधा राजपूत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. श्रीहर्ष जहागीरदार आणि सदिच्छा गतिमंद विद्यालयाचे उपाध्यक्ष होमिओपॅथी डॉ. आनंद कापसे(ठाणे )यांनीही मार्गदर्शन केले. विशेष शाळांतील सुमारे १६५ शिक्षक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. *जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात सहायक साधनांचे वितरण; संवेदना प्रकल्पाची पाहणी* कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाचे आयुक्त एस. गोविंदराज आणि राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी गरजू दिव्यांगांना आधुनिक चष्मा, काठी, व्हीलचेअर आणि पीएलएम किटचे वितरण करण्यात आले. तसेच, संवेदना प्रकल्पातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मयुरी मॅडम यांनी केले, तर डॉ. योगेश निटूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.संवेदना दिव्यांग आयटीआय ची माहिती श्री विठ्ठल गाडेकर यांनी दिली, या प्रसंगी आयटीआय चे अध्यक्ष श्री श्याम भराडिया, सह कार्यवाह श्री प्रवीण सगर, संपर्क प्रमुख सुरेश दादा पाटील, उपस्थित होते. कार्य शाळा प्रभावी होण्यासाठी व्यंकट लामजने, येडले मॅडम, दिपक क्षीरसागर,पारस कोचेटा, बसवराज पैके, श्याम शेटे, यांनी प्रयत्न केले *****
08/11/2025