संवेदना शाळेतील मुले, पालक व त्यांचे कुटुंबीय यांचा पालक स्नेह मिलनाचा कार्यक्रम गोपाळपूर, औसा येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये पार पडला
संवेदना शाळेतील मुले, पालक व त्यांचे कुटुंबीय यांचा पालक स्नेह मिलनाचा कार्यक्रम गोपाळपूर, औसा येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये पार पडला
दि. 11 जानेवारी 2025 वार - शनिवार, रोजी संवेदना शाळेतील मुले, पालक व त्यांचे कुटुंबीय यांचा पालक स्नेह मिलनाचा कार्यक्रम गोपाळपूर, औसा येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर कमिटीचे सहअध्यक्ष तथा नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरु ह.भ.प.श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर व अध्यक्ष म्हणून संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष मा.डॉ.राजेशजी पाटील व प्रकल्पाचे कार्यवाह मा. डॉ. योगेशजी निटूरकर,शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. चित्राताई बजाज उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपाताई पाटील यांनी केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी संवेदना प्रकल्प व प्रकल्पामध्ये चालणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमाविषयी माहिती दिली. या वेळी सद्गुरु ह.भ.प.श्री. गहिनीनाथ महाराजांनी आपल्या आशीर्वाचनात असे मत व्यक्त केले की - मुळात आई होणं हे कठीण आहे व त्यातही एका दिव्यांग मुलाची आई होणं हे त्याहून अधिक कठीण कार्य - जबाबदारी आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे, मुले किंवा पालकांचे हे भाग्य नाही तर माझेच भाग्य मी मानतो की मला या दिव्यांग मुलांसोबत वेळ घालवता आला.सामान्य कार्यक्रमात कोणीही जाईल परंतु या मुलांचे कौशल्य इथे येऊन मला पाहायला मिळाले यातच माझं पुण्य कमावणे बाकी होते ते आज पार पडले, असे मी समजतो.या मुलांना घेऊन पंढरपूरास विठ्ठल दर्शनास नेण्याचा मानस यावेळी महाराजांनी व्यक्त केला. या प्रसंगी शाळेतील मुलांची गीत व विशेष शिक्षिका सौ.जयश्री माने यांनी बसविलेली "मित्र प्रेम" ही नाटिका सादर केली. या कार्यक्रमात क्रीडा स्पर्धा, नाट्य स्पर्धा व गीत गायन स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी प्रकल्प समिती सदस्या सौ.अश्विनीताई लातूरे, सर्व विद्यार्थी व त्यांचे भावंड, पालक, शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिजिओथेरपिस्ट सौ.डॉ.मयुरी बिल्लावार यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार श्री.योगेश्वर बुरांडे यांनी मानले. या कार्यक्रमानंतर विद्यार्थी व पालक यांची गटश: खेळ घेण्यात आले. यात पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आनंद घेतला.