स्वामी विवेकानंदांचे चारित्र्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल : डॉ. संदीप जगदाळे लातूर / प्रतिनिधी : स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ मां साहेब जयंती व राष्ट्रीय युवा दिना निमित्त संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हरंगुळ (बु) लातूर येथे दयानंद महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख डॉ संदीप जगदाळे यांनी विषय मांडणी केली. कार्यक्रमाचे प्रारंभ प्रतिमा पुजनाने झाली. या कार्यक्रमासाठी संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ योगेश निटुरकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री शामकुमार भराडिया, संवेदना बहुविकलांग शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाताई पाटील, समनव्यक श्री विठ्ठल गाडेकर, विशेष शिक्षक व संवेदना दिव्यांग औद्योगिक संस्थेचे समिती सदस्य श्री व्यंकट लामजने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीमान गाडेकर यांनी स्वामी विवेकानंदांची व मां जिजाऊ यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ संदिप जगदाळे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा परिचय करून दिला. पुढे स्वामी विवेकानंदांबद्दल विस्तृत विषय मांडणी केली. स्वामी विवेकानंदांना लहानपणापासून जातीयता व सामाजिक विषमतेबद्दल चिड होती. दातृव भाव आणि त्यागी वृत्ती त्यांच्यात होती. यावरून त्यांनी विवेकानंदांच्या जिवनातील अनेक प्रेरणादायी किस्से श्रोत्यांसमोर प्रकट केले. स्वामी विवेकानंद अगदी लहानपणापासून ध्यान धारणेचे उपासक होते, त्याशिवाय ते सन्यासीवृत्तीचे उपासक होते. लहानपणापासूनच तल्लख असलेल्या विवेकानंदांनी त्यांच्या दहावीच्या वर्गाचा अभ्यास केवळ दोनच महिन्यात करून सर्व प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. १८८५ साली त्यांनी रामकृष्ण परमहंस यांची गुरु दिक्षा घेतली. ज्ञान, वैराग्य आणि चारित्र्य संपन्न स्वामीजी भारतभ्रमण करत कन्याकुमारी येथे येऊन आपल्या धर्म कार्यास सुरुवात केली. पुढे शिकागो येथे झालेल्या धर्म परिषदेत जाऊन त्यांनी हिंदू धर्मातील सर्व वेद व आचरण पध्दती ह्या वेज्ञानिक आहेत हे त्यांनी भोगवादी पाश्चिमात्यांना दाखवून दिलं. त्याशिवाय शिकागो येथे झालेल्या धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी प्रथमच "येथे उपस्थित माता आणि भगिनी" असे म्हणून भाषणाला सुरवात केली होती. हिंदू धर्म भारत देशाच्या सहिष्णुता व सर्व धर्म समभावाबद्दल बोलले. हिंदू धर्म जगात सर्वश्रेष्ठ कसा ठरतो याची अनुभूती त्यांनी जगाला करून दिली. कार्यक्रमाचा अध्यक्षक्षीय समारोपात डॉ योगेश निटूरकर म्हणाले की स्वामी विवेकानंदांनी माणूस व राष्ट्र घडवणारं शिक्षण असावं अशी धारणा प्रेरित केली, आणि त्यामुळेच भारतीय शिक्षणाला त्यांचे विचार समुपदेशक ठरतील असे वक्तव्य त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पदृष्टी दिव्यांगत्व असलेल्या कु. रमन राजनाळे या विद्यार्थ्याचा युवक दिनानिमित्त संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
22/01/2025