जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे उद्घाटन - ‘एलिम्को’ च्या पथकामार्फत तीन दिवस होणार दिव्यांग तपासणी. लातूर, दि. १७ : दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव आणि सहायक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को), लातूर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय दिव्यांग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र येथे १७ डिसेंबर पासून होत असलेल्या या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनमोल सागर यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, सहकार्यवाह प्रवीण सगर, ‘एलिम्को’चे डॉ. किरण पावरा, डॉ. रतन जाधव, डॉ. रितू, डॉ. प्रियांका चंद्रा, जिल्हा परिषद दिव्यांग विभागाचे सहायक सल्लागार बाळासाहेब वाकडे, दिव्यांग आयटीआयचे प्राचार्य श्री. विठ्ठल गाडेकर यांच्यासह समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. १७ ते १९ डिसेंबर दरम्यान होत असलेल्या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या पात्र दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, काठी, कुबडी, तसेच ८० टक्केपेक्षा अधिक दिव्यांगत्व असल्यास बॅटरीवरील तीनचाकी सायकल, अंधत्व असूनही इयत्ता दहावीनंतरचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, सेन्सर असलेली काठी, मुकबधीर मुलांना श्रवणयंत्र आदी सहायक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तीन दिवसात जवळपास ४५० दिव्यांग बांधवांच्या तपासणीचे उद्दिष्ट आहे. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना सहायक उपकरणांचा पुरवठा करण्यासाठी लवकरच तालुकास्तरीय दिव्यांग तपासणी शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांमध्ये विविध क्षमता असतात. ते सामान्य व्यक्तींप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करू शकतात. यासाठी त्यांना आवश्यक असलेले सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासन आणि लातूर जिल्हा परिषद कटीबद्ध आहे. त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र स्थापन करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनमोल सागर यावेळी म्हणाले. दिव्यांग तपासणी शिबिरासाठी वैद्यनाथ व्हनाळे, सुमित्रा तोटे, बस्वराज पैके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकट लामजने यांनी केले, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता राजू गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
22/01/2025