लातूर व धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग शाळा चालवणाऱ्या संस्थांचे अध्यक्ष / सचिव, मुख्याध्यापक व वसतिगृह अधीक्षक यांची कार्यशाळा दि. 3 सप्टेंबर 2024 रोजी जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ (बु) ता.जि.लातूर येथे संपन्न झाली. प्रादेशिक उपायुक्त श्री. अविनाश देवसटवार यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून संस्था कार्य करीत आहेत. पण दिव्यांगांचे 21 प्रकार त्याची तपशीलात माहिती संस्थाचालक अथवा मुख्याध्यापक यांना नसते. ही माहिती देण्याचे एक सत्र या ठिकाणी होणार आहे. शाळेची जी संहिता आहे, त्याचे नीट आकलन न झाल्यामुळे कर्मचारी – संस्थाचालक, शिक्षक – मुख्याध्यापक, कर्मचारी – शासन असे विनाकारण वाद निर्माण झाल्याचे कळते. ही त्रुटी दुर व्हावी म्हणून शाळा संहितेची माहिती, RPD Act 2016, National Trust Act 1999, याची माहिती तज्ञांमार्फत या ठिकाणी दिली जाणार आहे. याचा अभ्यास सर्वांनी करावा असे देवसटवार साहेबांनी नमुद केले. उदघाटन सत्रामध्ये संवेदना प्रकल्पाचे मा. अध्यक्ष तथा लातूर मधील जेष्ठ फिजीशियन डॉ. राजेश पाटील यांनी रक्त बाधीत दिव्यांग प्रवर्गाची वैद्यकीय माहिती साध्या व सोप्या भाषेत सर्वांना अवगत करुन दिली. थँलेसिमिया, सिकल सेल, हिमोफिलीया याविषयीच्या समस्या व त्यावर उपाय असे अभ्यासपुर्ण मार्गदर्शन झाले. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्रीमती मनिषा बोरुळकर यांनी दिव्यांगांसाठी कौशल्य विकसित करण्याचे तंत्र / मार्ग याची माहिती विविध उदाहरणाने स्पष्ट करुन सांगितले. संवेदनाचे संपर्क प्रमुख श्री. सुरेश पाटील यांनी संस्थेची गुणवत्ता वाढण्यासाठी समाजाचा सहभाग महत्वाचा असल्याचे अधोरेखित केले. संस्थाचालक, कर्मचारी, दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक यांचे समन्वय राहणे महत्वपुर्ण आहे. संस्थेचे आर्थिक नियोजन पारदर्शी असावे जेणेकरुन सी एस आर फंड, समाजातून देणगी मिळू शकते. यासाठी संस्थेचे आर्थिक व्यवस्थापन चांगले असावे. उदघाटन सत्रानंतर संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन 2024-25 मधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील दिव्यांगांकरिता पहिली आय टी आय म्हणून संवेदना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे. याचे महत्व लक्षात घेवून या कार्यशाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. दिव्यांग शाळा संहिता या विषयावर दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले श्री. मधुकरराव काथवटे यांनी विस्तृत नियमावली विषद केली. आज पर्यंत तीन शाळा संहिता तयार करण्यात आलेल्या आहेत. यातील सर्व नियमांचा सखोल अभ्यास काथवटे सरांकडे असल्याने कार्यशाळेत याची उपयुक्त माहिती सादर करण्यात आली. पोक्सो कायदा 2012 या विषयावर लातूर मधील अँड. प्रविण पाटील यांनी अभ्यासपुर्ण माहिती मुख्याध्यापकांना दिली. या कायद्याअंतर्गत संस्थेची भूमिका, कर्मचाऱ्यांचे दायित्व, हे विगत केले. सर्वांच्या जबाबदारीचे स्पष्टीकरण करण्यात आले. भोजनोत्तर सत्रामध्ये संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पाहणी उपस्थित संस्थाचालक, मुख्याध्यापक व मान्यवरांनी केली. यानंतर श्री. नंदकुमार फुले यांनी दिव्यांग विषयावरती विविध कायद्याची माहिती दिली. 1985 चा मेंटल हेल्थ कायदा, 1995 दिव्यांग व्यक्ती समान संधी समान हक्क अधिनियम, 1999 चा राष्ट्रीय न्यास कायदा, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 या कायद्यातील नियम, दिव्यांगांचे अधिकार, संस्थाचालक, कर्मचारी यांची जबाबदारी याचे स्पष्टीकरण विविध उदाहरणाने देवून केले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनी या कार्यशाळेत झालेल्या विषयांबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, असे विषय आमच्यासाठी महत्वाचे आणि आवश्यक आहेत. प्रत्येक वर्षी अशा विविध विषयांवर कार्यशाळा घेणे गरजेचे आहे. या ठिकाणची व्यवस्था उत्तम होती. समाजकल्याण विभाग व संवेदना प्रकल्पाचे आम्ही आभार व्यक्त करतोत. कार्यशाळेचा समारोप करीत असताना श्री. देवसटवार सर म्हणाले की, सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनी पुर्णवेळ उपस्थित राहून कार्यशाळेत सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी आलेले तज्ञ व डीडीआरसी लातूर यांचे आभार व्यक्त केले . कार्यशाळेला जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी, वैसाका राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार श्री. बाळासाहेब वाकडे, धाराशिवचे समाजकल्याण विभाग कार्यालय अधीक्षक श्री. विकास चव्हाण, संवेदना प्रकल्पाचे श्री. शाम भराडिया, आय टी आयचे समन्वयक श्री. विठ्ठल गाडेकर यांची उपस्थिती होती. कार्यशाळेचे सुत्रसंचालन श्री. व्यंकट लामजणे व श्रीमती मयुरी बिल्लावार यांनी केले.
22/01/2025