दि. 9 ऑगस्ट 2024 रोजी संवेदना प्रकल्प तथा डीडीआरसी लातूर आणि IPOD संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सेरेब्रल पाल्सी (मेंदुचा पक्षाघात) मुलांचे वैद्यकीय तपासणी शिबीर संदीकर हॉस्पीटल येथे संपन्न झाले. मुंबई येथील नामांकित संस्था Institute Of Paediatric Orthopaedic Disorders (IPOD) आहे. या संस्थेचे प्रमुख, प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. तरल नागदा यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर झाले. डॉ. नागदा सर सी पी मुलांच्या हाडासंदर्भातील व्याधीप्रकारात दुरुस्त करण्यामध्ये नैपुण्य आहेत. याच क्षेत्रात गेल्या 25 वर्षांपासून कार्य करीत आहेत. भारतातील विविध भागात त्यांनी सी पी मुलांसाठी वैद्यकीय तपासणी व उपचार – शस्रक्रिया केलेली आहे. लातूर शहरातील संदीकर हॉस्पीटल येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. श्रीनिवास संदीकर हे ऑर्थोपेडिक सर्जन असून संवेदना प्रकल्पाचे सदस्य आहेत. या शिबीरासाठी त्यांनी त्यांच्या हॉस्पीटल मधील एक्स रे विभाग व रक्त तपासणी लँब उपलब्ध केल्याने पालकांची सोय झाली. या शिबीरात 75 विद्यार्थ्यांची पूर्व नोंदणी झालेली होती. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या संपर्कातील 53 जणांची शिबीरामध्ये तपासणी करण्यात आली. सी पी मुलांची तपासणी त्यांच्या पालकांच्या प्रश्नांची उत्तरे, सल्ला मसलत असे स्वरुप होते. डॉ. तरल नागदा यांच्यासोबत डॉ. प्रविण विश्वकर्मा (पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन), डॉ. अंशी उपाध्याय (पेडियाट्रिक फिजीओथेरपीस्ट), डॉ. अमिना मारकर (पेडियाट्रिक फिजीओथेरपीस्ट), हे तज्ञ होते. 53 सी पी मुलांपैकी 25 जणांची शस्रक्रिया ज्युपिटर हॉस्पीटल ठाणे येथे मुस्कान चँरीटेबल ट्रस्टच्या सहाय्याने निशुल्क होणार आहेत. प्रत्येक बुधवारी ही शस्रक्रिया करण्याचे निश्चित झाले आहे. या मुलांच्या शस्रक्रिया ऑक्टोबर पर्यंत पुर्ण होणार आहेत. Percutanious Myofascial Release तथा बोटॉक्स इंजेकशन या शस्रक्रियांसोबतच इतरही क्लिस्ट प्रकारच्या शस्रक्रिया होणार आहेत. शरीरातील कडकपणा कमी करण्यासाठी सेरेब्रल पाल्सी प्रवर्गातील दिव्यांगांना अशा शस्रक्रियेची अत्यंत आवश्यकता असते. भविष्यातही वय वाढेल तसे पुन्हा पुन्हा शस्रक्रिया करणे आवश्यक असते. शस्रक्रिया केल्यानंतर नियमीत फिजीओथेरपी हा महत्वाचा विषय आहे. या सर्व बाबी पालकांना तज्ञांकडून अवगत करुन देण्यात आल्या आहेत. हा विषय मोठा खर्चिक असल्यामुळे आणि पालकांवरती त्याचा बोजा पडू नये यासाठी संवेदना प्रकल्प व मुस्कान चँरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांनी निशुल्क शस्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे. याबाबतीत पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. दिव्यांगांच्या पुनर्वसन कार्यात हा एक महत्वाचा टप्पा आहे. त्याचे कारण दिव्यांग मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत होते. सी पी मुलगा स्वावलंबी होण्यास मदत होते. मुंबईला जाण्या – येण्याचा खर्च, बोटॉक्स इंजेक्शन, कांही कृत्रिम साधने याचा खर्च पालकांनी करणे अपेक्षित आहे. या शिबीराच्या उदघाटन प्रसंगी प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, उपाध्यक्ष अँड. श्रीराम देशपांडे, सक्षम राष्ट्रीय सहसचिव श्री. सुरेश पाटील समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी, वैसाका श्री. राजु गायकवाड, डॉ. मयुरी बिल्लावार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. आरती संदीकर यांनी केले.
22/01/2025