दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी महसुल पंधरवाडा निमीत्त जिल्हाधिकारी कार्यालय, सहायक आयुक्त समाजकल्याण विभाग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, कार्यान्वयन संस्था रा.स्व.संघ जनकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी एकाच छताखाली विविध शासकीय योजनांची सहाय्यता करण्यासाठी “एक हात मदतीचा ... दिव्यांगांच्या कल्याणाचा” हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ऋषी अष्टावक्र व हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पुजन केले. मुंबई मधील दृष्टीबाधीत श्री. रमेश सावंत यांनी दिव्यांगांकरिता भरीव कार्य केल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 800 पेक्षा अधिक दिव्यांगांनी या शिबीरामध्ये नोंदणी केली. कार्यक्रमास मा. आमदार डॉ. भारती लव्हेकर, मा. आमदार अमित साटम, डॉ.भागवत डी गावंडे, उपविभागीय अधिकारी पश्चिम उपनगर, रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे प्रांत अध्यक्ष डॉ. अजित मराठे, सक्षमचे राष्ट्रीय सहसचिव तथा संवेदना प्रकल्पाचे संपर्क प्रमुख श्री. सुरेश पाटील, राष्ट्रीय बौद्धिकजन अधिकारिता संस्थान विभागीय कार्यालय मुंबईचे संचालक डॉ.श्री. रविप्रकाश सिंग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री. विवेक आचार्य, श्री. किरण परब, श्री. आशिष गोडबोले, सक्षम कोकण प्रांत अध्यक्ष ॲड. मंजिरी पारसणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार भारतीताई लव्हेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले की, दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध य़ोजना आहेत. या योजनांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता अशा शिबीरांची अत्यंत आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाच्या व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम स्तुत्य आहे. अशा कार्यक्रमांची खुप गरज आहे. असे कार्यक्रम वारंवार घेण्याची गरज असल्याचे प्रकट केले. आमदार अमित साटम यांनी देशामध्ये पंतप्रधान मोदीजींनी दिव्यांग हा शब्द सुचविला. शासनाच्या सर्व यंत्रणांनी मिळुन आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराचे कौतुक केले. दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या सर्व संस्था व प्रशासनाचे आभार मानले. शासनाच्या दिव्यांगांसाठी विविध योजना आहेत. पण त्या दिव्यांग व्यक्तींना व त्यांच्या पालकांना माहित नाहीत. ज्यांना माहीत आहेत त्यांना त्या प्राप्त कशा करायच्या ? त्यासाठी विहीत नमुन्यातील अर्जासोबत अन्य कोणते कागदपत्र जोडायचे ? हे माहित नाही. ही महत्वपुर्ण बाब ओळखून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, मुंबई यांनी महसुल विभागाचा पंधरवाडा प्रभावीपणे राबविला त्याबद्दल माझ्याच शासनाचे व येथील सर्व शासकीय यंत्रणांचे मी अभिनंदन व आभार प्रकट करतो. सक्षम तथा संवेदना प्रकल्पाचे श्री. सुरेश पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांचा 5 टक्के दिव्यांग निधी हा दिव्यांगांसाठी खर्च केला पाहिजे. लोकप्रतिनिधी यांनी या विषयाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. देशभरात 280 जिल्ह्यात डीडीआरसी ची नोंद झाली आहे. पण 30-40 डीडीआरसी अ श्रेणीमध्ये कार्यरत आहेत. मुंबई डीडीआरसी अ श्रेणीमध्ये येण्यासाठी आजचा कार्यक्रम सर्वांना प्रेरणा व आत्मविश्वास देणारा आहे. या ठिकाणी अंमलबजावणी करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती ही महाराष्ट्रातील सेवा क्षेत्रातील अग्रणी संस्था आहे. या संस्थेचे ब्लड बँक, पनवेल येथील हॉस्पीटल, मुंबई येथील वस्ती परिवर्तन योजना, दिव्यांगांसाठी कार्य करणारा संवेदना प्रकल्प चालविंले जातात. अशा संस्थेकडे DDRC चे काम दिल्यामुळे दिव्यांगांसाठी भरीव कार्य होईल. कारण संस्थेची ही धारणा आहे की, दिव्यांगांची समस्या ही केवळ त्या व्यक्तीची अथवा कुटुंबाची नाही. ही समस्या समाजाची आहे, प्रशासनाची आहे. त्यासाठी समस्याचं निराकारण करण्याची जबाबदारी समाजाची व प्रशासनाची आहे. या ठिकाणी आणखी एक महत्वपुर्ण संस्था कार्य करते ती म्हणजे सक्षम. सर्व प्रवर्गासाठी संपुर्ण देशभरात या संस्थेचे कार्य आहे. त्यांच्या सहकार्यांनी हे शिबीर या ठिकाणी होत आहे. अंधेरीच्या तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महसुल पंधरवाडा या कार्यक्रमाची माहिती विषद केली. सर्व शासकीय यंत्रणांची माहिती दिली. तसेच हा कार्यक्रम जिल्हाधिकारी महोदयांच्या नियंत्रणाखाली रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्थांचे त्यांनी आभार मानले. श्री. विवेक आचार्य यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्याचे सविस्तर वर्णन करुन जास्तीत जास्त दिव्यांगांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्री. व्यंकट लामजणे यांनी विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. सकाळी 9.00 वाजल्यापासून विविध शासकीय योजनांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने दिव्यांगांसाठी यु डी आय डी कार्ड नोंदणी, निरामय आरोग्य विमा योजना व विविध शासकीय योजनांची माहिती ठेवण्यात आली होती. राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन अधिकारिता संस्थान, भारत सरकार यांच्या वतीने बौद्धिक दिव्यांगांकरिता टी एल एम कीटचे वितरण करण्यात आले. विविध योजनांची माहिती देण्यात आली. अलीमको कंपनीचा स्टॉल होता ज्यामध्ये दिव्यांगांची नोंदणी व त्यांच्या गरजेनुसार लागणाऱ्या कृत्रिम अवयव, स्मार्ट फोन, काठी, कानाचे मशीन यांची नोंदणी करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे पेन्शन योजनांचा स्टॉल लावण्यात आला होता. यामध्ये सर्व दिव्यांगांना पेन्शन योजनेचा लाभ देण्याबाबत नोंदणी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या म्हाडा या मंडळाचा स्टॉल लावण्यात आला होता. यामध्ये दिव्यांगांसाठी गृह योजना देण्याबाबत नोंदणी करण्यात आली. केंद्र शासनाच्या अली यावर जंग राष्ट्रीय संस्थानच्या वतीने कर्णबधीर दिव्यांगांकरिता विविध शासकीय योजनांची माहिती व नोंदणी करण्यात आली. तहसील कार्यालय अंधेरी यांच्या वतीने डॉमीसिल प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, मतदार नोंदणी, आधार नोंदणी, संजय गांधी निराधार योजना या योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये अधिकाधिक दिव्यांगांना लाभ देण्यात आला. अंधेरी तहसीलदार यांच्या वतीने नैसर्गिक आपत्ती सहाय्यता रु. 4 लक्ष मंजुरीचे पत्र मनोहर शंकर चव्हाण यांना देण्यात आले. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमामध्ये महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी, दिव्यांग शाळांमधील मुख्याध्यापक, विशेष शिक्षक, विद्यार्थी, सहाय्य करण्याकरिता मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वालीया महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. तसेच किर्ती महाविद्यालयाचे व्यवस्य़ापन शाखेचे विद्यार्थ्यांनीही स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. सुनिता आचार्य यांनी केले. कमला मेहता अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर असे स्वागत गीत सादर केले.तर आभार चेतना पाटील यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर दिव्यांग व्यक्ती, त्यांचे पालक, नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाकरिता नायब तहसीलदार श्री. सानप सर, श्री. रामेश्वरजी, अश्विनी रेशीम यांचे महत्वाचे सहकार्य लाभले.जनकल्याण समिती व सक्षम च्या कार्य कर्त्यानी परिश्रम घेतले.
31/12/2024