सक्षम (धीमही प्रकोष्ठ), सह्याद्री परिवार, ‘संवेदना’ प्रकल्प हरंगुळ (बु.) लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने, दि. 27,28 जानेवारी 2024 रोजी कार्यशाळा संपन्न झाली. बुद्धीबाधित (बौद्धिक दिव्यांग, मेंदूचा पक्षाघात, आत्ममग्न, बहुविकलांग) दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या संस्थेसाठी ही कार्यशाळा होती. या कार्यशाळेत परिवार सह्याद्री मुंबई, जागृती पालक संस्था ठाणे, सक्षम देवगिरी प्रांत, सक्षम कोकण प्रांत, स्वयंसिद्ध मातृ पालक संस्था संभाजीनगर, पॅन स्वयंरोजगार संस्था मुंबई, दिव्यांग विकास व प्रशिक्षण संस्था सावंतवाडी, जिव्हाळा पालक संस्था लातूर, संधी निकेतन शिक्षण संस्था उदगीर, जाणीव जागृती संस्था सोलापूर, सक्षम पश्चिम महाराष्ट्र, अबनॉर्मल होम मानवीय संशोधन संस्था पुणे, संगमेश्वर शिक्षण मंडळ वलांडी ता. देवणी, सिद्ध दिव्यांग फाउंडेशन पुणे, अहिल्यादेवी होळकर शिक्षण प्रसारक संस्था अहमदपूर, ‘विहंग’ विशेष मुलांची शाळा संभाजीनगर, श्री गजानन बहुउद्देशीय संस्था बोरी, रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित ‘संवेदना’ प्रकल्प, साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, समाज कल्याण विभाग जि.प. लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर अशा 22 संस्थांची उपस्थिती होती. उद्घाटन सत्रामध्ये निलंगा येथील कै. गंगाबाई बोरुळे निवासी अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी भावस्पर्शी गीत गायले. संगीत शिक्षक श्री. ज्ञानेश्वर पिंगाणे जे स्वतः दृष्टीबाधित आहेत, पेटी वादक आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट गीत तयार करवून घेतले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांचे प्रधान सचिव मा.श्री. अभय महाजन यांनी केले, ते म्हणाले बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग विषयाकरीता कार्य करणाऱ्या संस्थांना या कार्यशाळेचा योग्य उपयोग होईल. या विषयात कार्य करणाऱ्या संस्थाचालकांना, विविध थेरापीस्ट किंवा विशेष शिक्षकांना विषयाचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. यामधील नवीन बाबींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. ‘संवेदना’ प्रकल्प व पालक संस्थांनी या कार्यशाळेत जे विषय निश्चित केले आहेत ते खरेच महत्त्वाचे आहेत त्यामुळे मी आयोजकांचे अभिनंदन करतो व त्यांना धन्यवाद देतो. उद्घाटन सत्रामध्ये या कार्यशाळेचा उद्देश याबद्दल ‘संवेदना’ प्रकल्पाचे मा. अध्यक्ष डॉ. राजेश पाटील (M.D. मेडिसीन) म्हणाले की समाजातील जो वंचित घटक आहे, त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांची गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी. बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनाचे कार्य हे दीर्घकालीन करावयाचे काम आहे. त्यासाठी आपल्या संस्थेत प्रशिक्षित मनुष्यबळ असावा लागतो. संस्थेचा कर्मचारी कुशल व तज्ञ होण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थितांनी सर्व विषयाचा सखोल अभ्यास करावा अशी अपेक्षा डॉ. राजेश पाटील यांनी व्यक्त केली. पहिल्या सत्रामध्ये लातूर मधील प्रसिद्ध न्यूरोफिजिशिअन डॉ. देवाशिष रुईकर यांनी ‘ऑटीझम’ या विषयावर मार्गदर्शन केले. आज मी येथे प्रथमच अष्टावक्र ऋषींच्या प्रतिमेचे पूजन केले. अष्टावक्र ऋषी बहुतेक आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार ते डिस्टोनिया होते. त्यांनी लिहिलेली गीता प्रसिद्ध आहे. ते ज्ञानी होते. जनक राजा व अष्टावक्र ऋषींचा जो संवाद झाला त्यालाच गीता म्हणतात. अष्टावक्र उच्च प्रतीचे कम्युनिकेशन करणारे होते. कम्युनिकेशन जेव्हा थांबते तेव्हा अनेक बाबी थांबतात. आजचा जो विषय आहे, तो म्हणजे ऑटीझम! ऑटीझम चा जो मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे कम्युनिकेशन आणि सोशलायझेशन. आज जगामध्ये ऑटीझम विषयावर जे भाष्य केलं जातं ते म्हणजे वैद्यकीय शास्त्रासमोर हे एक मोठे आव्हान आहे. आपल्या सर्वांना अवगतच आहे की, जगामध्ये जे अधिक संशोधन होते ते म्हणजे अमेरिका व युरोप देशामध्ये. अमेरिकेच्या इ.स. 2022 डाटाप्रमाणे 10,000 मुलांमध्ये एक ऑटीझमचा मुलगा, काही वर्षांनंतर 8000 मुलांमध्ये एक ऑटीझम आणि आत्ता कोविड नंतर 88 मुलांमध्ये एक ऑटीझम मुलगा असे चित्र आहे. अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने डाटा कलेक्शन आहे तसे भारतामध्ये नाही. आपल्या देशामध्ये कोणत्याही ऑटीझम असोसिएशन किंवा बालरोग तज्ञांच्या असोसिएशननी अथवा सायकॅट्रिक असोसिएशन नी असा डाटा एकत्रित केलेला नाही. त्यामुळे भारतातील ऑटीझम ची संख्या अथवा सर्वेक्षण सांगता येणार नाही. ऑटीझम असलेली मुले व्यक्त होत नाहीत. काही सांगू शकत नाहीत. त्यामुळे भाषा विकसित होऊ शकत नाही. पालकांच्या प्रत्येक अपेक्षा ही एक अडचण आहे. अनेक पालकांना विशेषतः ग्रामीण भागातील पालकांना या विषयाचे गाढ अज्ञान आहे. जे उच्चशिक्षित आहेत त्यांना ऑटीझमची अति माहिती आहे, नेटवरती पाहून ऑटीझम विषयाचे मूल्यांकन करीत असतात, असे होऊ नये. 6 वर्षानंतरच मुलांच्या हातात पेन हवी आहे. ऑटिझम का होतो ? याचे नेमके कारण आता तरी सांगता येणे कठीण आहे. सामाजिक, जेनेटिक, स्मार्टफोन चा शिशु, बालपणी असतानाच अतिवापर ही कारणे समोर येत आहेत. याचे लवकर निदान होणे निदान झाल्यावर विशेष शिक्षण, ऑक्युपेशनल थेरापी यावरती भर देणे आवश्यक आहे. चाइल्ड सायकोलॉजिस्ट ची मदत घेऊन त्यावरती उपचार करणे महत्त्वाचे आहे. ऑटिझम साठी आजतागायत कोणतेही औषध नाही. ऑटिझम एकटा नसतो. त्याच्या सोबत हायपर ॲक्टिव्हिटी, अटेन्शन डिफीसीट, लर्निंग डिसेबिलिटी व त्याचा बुद्ध्यांक किती आहे यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पालकांनी आणि या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी या सर्व बाबींचा विचार करून त्याचे नियोजन करायला हवे. ऑटीझम मेडिकल दृष्ट्या दुरुस्त करता येणार नाही. अमेरिकन सोसायटीचे निरीक्षण आहे की, ऑटीझम व्यक्तीचे अधिकतम चांगले मित्र असायला पाहिजे. घराची रचना त्याच्या गरजेनुसार असायला हवी. विविध थेरापी, विविध उपक्रमांचा अभ्यास पालकांना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी स्वतः पालक तणावरहीत, स्वस्थ असायला पाहिजे. पालकांनी स्वतःला छान ठेवलं पाहिजे. आजची ही कार्यशाळा महत्त्वाच्या विषयावर होत आहे ही बाब महत्वाची व योग्य आहे .पालक संस्था, सक्षम आणि डीडीआरसी – संवेदना प्रकल्प लातूर यांनी आयोजित केली त्याबद्दल संस्थेला धन्यवाद देतो. दुसऱ्या सत्रात संस्था स्थापन करण्याची कायदेशीर प्रक्रिया याविषयी विवेकानंद रुग्णालयाचे अध्यक्ष ॲड. अनिलराव अंधोरीकर यांनी माहिती दिली. तिसऱ्या सत्रात दिव्यांगासाठी शासकीय योजनांची माहिती समाजकल्याण अधिकारी श्री. संतोष कुमार नाईकवाडी आणि वैसाका श्री. राजू गायकवाड यांनी दिली. चौथ्या सत्रात श्री पुरुषोत्तम बुरडे यांनी सेल्फ ॲडव्होकेसीचा महत्त्वपूर्ण विषय मांडला तर निवासी कौशल्य उपक्रमासंबंधी श्री. सतीश धुरत आणि श्री. बस्वराज पैके यांनी चर्चासत्र घेतले. दि. 28 जानेवारीला परिवार NCPO चे पूर्व अध्यक्ष कमांडर श्रीरंग बिजूर यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पालक संस्थाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात मानसोपचार तज्ञ डॉ. राहुल भातांब्रे खारघर मुंबई व क्लिनिकल सायकोलॉजिस्ट श्री. स्वप्नील भोपी यांनी सायकोलॉजिस्ट व सायकॅट्रिक यामधील फरक व त्याचे महत्त्व अतिशय सुंदर सोप्या भाषेत मांडले. यावरती अनेक प्रश्नांची उकल या सत्रात झाली. संस्थेचे आर्थिक व्यवस्थापन, नवीन नियमावली, कायदेशीर बाबी या संबंधीचे अभ्यासपूर्ण विवेचन सीए श्री. मधुसूदन बजाज यांनी केले. या कार्यशाळेचा समारोप पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे काका व मा. न्यायाधीश श्री. किशोरजी चौधरी यांनी केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन नांदेडच्या नर्सिंग कॉलेजमधील प्राध्यापिका अनिता देशमानेंनी केले. लातूर मधील BSW, MSW व वै.म. मधील नर्सिंग विभागातील कर्मचारी यांनी सहाय्यता केली. याप्रसंगी संवेदना प्रकल्पाच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वार्षिक अंकाची माहिती संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर यांनी दिली. जि.प. लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या वतीने महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या दृष्टीबाधित युवकांना (कु. पूजा देविदास राठोड, श्री. प्रेमकुमार अच्युत शिंदे, कु. साक्षी शिवराज संपत्ते, श्री. अमोल कालिदास महाके, कु. प्रतिभा शिवाजी परिट, कु. अनुसया सुभाष धोंडजे ) अँड्राईड मोबाईल आणि बुद्धीबाधित मुलांसाठी शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले. दयानंद महाविद्यालय आणि संस्कार भारती लातूर यांचा बहारदार संगीत - गायनाचा कार्यक्रम झाला.
31/12/2024