जागतिक आरोग्य दिन – लातूर येथे विविध उपक्रमांनी साजरा
जागतिक आरोग्य दिन – लातूर येथे विविध उपक्रमांनी साजरा
शुक्रवार दि. 7 एप्रिल 2023 रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) – संवेदना प्रकल्प आणि विवेकानंद रुग्णालय, लातूर यांच्या वतीने विविध उपक्रमांचे, आयोजन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे करण्यात आले.
रेटीनोपॅथी ऑफ प्रिमँच्युरीटी अर्थात नवजात अर्भकामधील दृष्टीदोष असेल तर त्यावरती निदान व उपचार करणे. विशेषत: दोन किलोपेक्षा कमी वजनाचे नवजात अर्भक असेल किंवा बाळाचा जन्म नैसर्गिक कालावधीपुर्वी कांही आठवडे झालेला असेल तर अशा नवजात शिशुमध्ये दृष्टीदोषाची अधिक शक्यता असते. त्याचे निदान त्वरीत होणे महत्वाचे आहे. निदान उशीरा झाले तर उपचाराला मर्यादा येत असतात. कांही जणांना कायमस्वरुपी अथवा दीर्घकालीन दृष्टी बाधीत होते. हा महत्वपुर्ण भाग लक्षात घेवून विवेकानंद रुग्णालय लातूर येथे (चिंतामणी फाऊंडेशन अमेरिका, सेवा यु एस ए यांच्या सहकार्याने) रेटीनोपॅथी संदर्भातील उपचाराचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. या उपक्रमाची वैद्यकीय माहिती रेटीना सर्जन डॉ. मयुर कुलकर्णी व नेत्र चिकीत्सक डॉ. गोसावी यांनी दिली.
दुसरा उपक्रम शुन्य दिव्यांगत्वाकडे जाणारा म्हणजे क़ॉक्लीयर इंप्लांट. श्रवणबाधीत बालकांची शस्रक्रिया लातूर मध्ये प्रथमच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय य़ेथे होणार आहे. याची माहिती अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी दिली. ही शस्रक्रिया ते स्वत: करणार आहेत. या शस्रक्रियेच्या खर्चाची व्यवस्था जिल्हा परिषद लातूर यांनी केलेली आहे. ज्या दोन बालकांची शस्रक्रिया होणार आहे त्या बालकाला त्यांच्या पालकांचा (चि. अर्णव गुडपल्ले, चि. अमित बेदरे) माजी पालकमंत्री तथा आमदार मा. श्री. संभाजीराव पाटील निलंगेकर आणि खासदार मा.श्री. सुधाकरराव शृंगारे यांच्या हस्ते पुष्प देवून अभिनंदन करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी जागा वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री मा.ना.श्री. गिरीशभाऊ महाजन यांनी जागा उपलब्ध करुन दिली. स्थलांतरीत जागेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना व त्यांच्या पालकांना या केंद्राचा उपयोग होईल. या ठिकाणी नाममात्र शुल्कामध्ये फिजीओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, कृत्रिम साधनांचे मोजमाप देणे, त्यासाठी साधने मिळविणे असे आर्थोसिस विभागाचे कार्य होणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या दिव्यांगांकरिता असलेल्या योजनांची माहिती व ती प्राप्त करुन घेण्याची कार्यपद्धती जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये कळु शकेल.
समाजकल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र संवेदना प्रकल्प, लातूर यांच्या पुढाकाराने जानेवारी 2023 मध्ये जिल्ह्यात 5 ठिकाणी कृत्रिम साधनांचे मोजमाप शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यातील प्रातिनिधीक स्वरुपात (कु. शर्मिला वाळगे, श्री. अमोल गव्हाणे) या दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क कृत्रिम साधने देण्यात आली. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दृष्टीबाधीत विद्यार्थांना (चि. योगेश बळीराम गोणेवार, चि. लक्ष्मण दिगंबर वाघमारे) अद्ययावत अँड्रॉईड मोबाईल फोन चे वितरण मा. जिल्हाधिकारी श्री. बी पी पृथ्वीराज साहेब व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिनव गोयल साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. 2 श्रवणबाधीत बालकांचे कॉक्लियर इंप्लांट प्रोसेसर खराब झाले होते. ते पण या प्रसंगी नि:शुल्क वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मभूषण डॉ. कुकडे काका होते. त्यांनी या सर्व उपक्रमांचे वैद्यकीय महत्व अधोरेखित केले. जे प्रत्यक्ष डॉक्टर मंडळी व अन्य संस्था गुंतल्या आहेत त्यांचे अभिनंदन व आभार कुकडे काका यांनी मानले.
उदघाटन समारंभापुर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यलयातील विद्यार्थ्यांच्या “अवयव दान” जनजागृती रॅलीस मान्यवरांनी झेंडा दाखविला. वैद्यकीय शिक्षण विभागानी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये अवयव दान प्रदर्शनाचे दालन निर्माण केले होते. त्याचेही उदघाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
मा. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्वत: अवयव दानाचे संकल्प पत्र अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांच्याकडे देवून म्हणाले की, लातूर जिल्ह्यात दिव्यांगांकरिता वैद्यकीय पुनर्वसनात्मक अनेक कार्य होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मा. खासदार श्री. सुधाकरराव शृंगारे म्हणाले की, राजकारणात येण्यापुर्वी पासून संवेदना प्रकल्पाचे समाजाभिमुक कार्य पाहतो. समाजातील वंचित अशा दिव्यांगांसाठी भरीव कार्य होत असल्याबद्दल संस्थेचे त्यांनी अभिनंदन, कौतुक केले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून. मा.जिल्हाधिकारी श्री. पृथ्वीराज बी पी साहेब यांनी सर्व उपक्रमांचा उल्लेख करुन त्याचे महत्व उपस्थितांना लक्षात आणून दिले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकरिता जागा आवश्यक होती. औसा रोड येथील जुनी जागा अपुरी पडत होती त्यामुळे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी वैद्यकीय शिक्षण विभागांनी जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांना धन्यवाद दिले. जिल्हा परिषदचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिनव गोयल साहेब म्हणाले की, कॉक्लियर इंप्लांट ची सर्जरी व त्यानंतरचा उपचार या ठिकाणी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील श्रवण बाधीत बालकांचे जरी अन्य ठिकाणी कॉक्लियर इंप्लांट झाले तरी, त्यांना एक वर्ष नियमीत स्पीच थेरपी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत मिळु शकेल. अशी योजना केली आहे. ROP या उपक्रमाचा विवेकानंद रुग्णालयानी प्रारंभ केल्याबद्दल रुग्णालयास त्यांनी धन्यवाद दिले.
या कार्यक्रमासाठी संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री. अविनाश देवसटवार साहेब, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी, वैसाका श्री. राजु गायकवाड, सहाय्यक सल्लागार श्री. बाळासाहेब वाकडे, विवेकानंद रुग्णालयाचे जेष्ठ डॉक्टर गोपिकिशन भराडिया, डॉ. महेश देवधर, डॉ. गौरवी कुलकर्णी, डीडीआरसीचे डॉ. योगेश निटुरकर, डॉ. भगवान देशमुख, श्री. सुरज बाजुळगे, श्री. बस्वराज पैकै आणि सर्व विशेष शिक्षक होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह श्री. सुरेश पाटील यांनी केले. सुत्रसंचालन डॉ.मयुरी बिल्लावार व डॉ. श्रेया पाटील यांनी केले. प्रकल्पाचे कोषाध्यक्ष श्री. शाम भराडिया, श्री. व्यंकट लामजणे, उपअधिष्ठाता डॉ.श्री. अजित नागावकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व जेष्ठ प्राध्यापक, पदव्युत्तर, पदवीचे विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे सर्व विद्यार्थी, दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक, शाळेतील थेरपीस्ट, डीडीआरसी मधील ऑर्थेसीस श्री. रुपेश जाधव, स्पीच थेरपीस्ट श्री. रतन जाधव, फिजीओथेरपीस्ट डॉ. श्रेयस कुलकर्णी, सायकॉलॉजीस्ट श्री. नितीन आळंदकर, संगणक विभागप्रमुख श्री. अनुप दबडगावकर, श्री. आदर्श भस्मे व सर्व विशेष शिक्षक उपस्थित होते.