संवेदना" प्रकल्पामध्ये जागतिक ऑटीझम डे उत्साहात साजरा
संवेदना" प्रकल्पामध्ये जागतिक ऑटीझम डे उत्साहात साजरा
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र – संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु) लातूर यांच्या वतीने 2 एप्रिल जागतिक "ऑटीझम दिन" "संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु) येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात लातूर मधील प्रसिद्ध न्युरोफिजीशियन डॉ. निलेश नागरगोजे यांनी पालकांना, विशेष शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी यांच्यासमोर ऑटीझम विषयाची माहिती विगत केली. ऑटीझम ही एक स्थिती आहे, हा रोग नाही. औषधासोबत विशेष शिक्षण, ऑक्युपेशनल थेरपी, कला शिक्षण या बाबींमुळे मुलांची प्रगती करता येवु शकते. मेंदुची वाढ वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत होऊ शकते. त्यानंतर त्यांना कौशल्य शिकवावी लागतात. या मुलांच्या विकासाचा टप्पा दीर्घकालीन आहे. त्यामुळे पालकांनी, शिक्षकांनी ऑटीझमच्या मुलांसोबत त्यांचे कलागुण ओळखुन कार्य करणे महत्वाचे आहे.
सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, बौद्धिक दिव्यांग, ऑटीझम, बहुविकलांग या संदर्भातील फरक डॉ. नागरगोजे यांनी सांगुन संवेदना शाळेमध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील विद्यार्थ्यांची बालनाटिका सादर करण्यात आली. राष्ट्रीय न्यास (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग) भारत सरकार यांनी दिल्ली येथे आयोजित केलेल्या बौद्धिक एवं विकासात्मक दिव्यांगजनांची प्रतिभा आणि संधी या विषयावरील राष्ट्रीय प्रदर्शनात गेलेल्या संवेदना शाळेतील विद्यार्थ्यांचे योग प्रात्यक्षिक उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले. या कार्यक्रमातच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध 4 गटांमध्ये 1. विशेष विद्यार्थी 2. विशेष विद्यार्थ्यांचे भावंडे 3. महिला पालक 4. पुरुष पालक यांचे खेळ घेण्यात आले. अनेकजन आपल्या बालपणीच्या खेळात रममाण झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ. योगेश निटुरकर यांनी माहिती दिली की, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर, अहमदपुर, चाकुर, निलंगा, मुरुड येथे दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम साधने मोजमाप शिबीर आयोजित केले होते. त्यांना लागणाऱ्या सर्व साहित्याचे वितरण नुकतेच करण्यात आले आहे. पालक स्नेह मेळाव्याचा समारोप प्रकल्पाचे कार्यवाह श्री. सुरेश पाटील यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फिजीओथेरपीस्ट डॉ. मयुरी बिल्लावार आणि विशेष शिक्षिका सौ. जयश्री माने यांनी केले. प्रकल्प समिती सदस्य श्री. राहुल देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या पालक स्नेह मेळाव्यासाठी पालक व विद्यार्थी मिळून 300 पेक्षा अधिक संख्या उपस्थित होती. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती जिल्हा समाजकल्याण श्री. संतोषकुमार नाईकवाडी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री. राजेश गायकवाड, लेखा परिक्षक श्री. मधुसुदन बजाज, संवेदना प्रकल्पाचे कोषाध्यक्ष श्री. शाम भराडिया, शालेय समिती चे श्री प्र.मा. जोशी सर,संवेदना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील हे होते.
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमीत्त व जागतिक ऑटीझम दिनानिमीत्त संवेदना प्रकल्पातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व उपचार करण्याची योजना नेत्र चिकीत्सक डॉ. प्रदिपकुमार शहा यांनी यावेळी व्यक्त केली.