संवेदना प्रकल्पामध्ये जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन साजरा
संवेदना प्रकल्पामध्ये जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन साजरा
संवेदना प्रकल्पामध्ये जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन साजरा करण्यात आला.सोमवार दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी "संवेदना" प्रकल्प हरंगुळ बु. लातूर येथे जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या दिनाचे औचित्य साधुन प्रकल्पातील सेरेब्रल पाल्सी विद्यार्थी व सीपी कर्मचारी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये श्री. बस्वराज पैके, चि. हिराचंद सूळ, चि. शशांक टेंकाळे, चि. निखिल इंजे, चि. गोपाळ मोटाडे, कु. मानवी पाटील, चि. अतुल पांघरकर, चि. जहीद पठाण इत्यादी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे फिजिओथेरपी एम.आय.पी. कॉलेजच्या विद्यार्थीनींनी संगीतावर नृत्य सादर केले. कलेमधून प्रबोधनाचा उत्कृष्ट नमुना सादर करण्यात आला. एमआयपी चे प्राचार्य डॉ. पल्लवी जाधव यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात फिजिओथेरपी कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत शाळेतील विद्यार्थ्यांनीही संगीताच्या तालावर उत्कृष्ट गाणे आणि नृत्य सादर केले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, लातूर च्या सल्लागार डॉ. सोनाली नागठाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सीपी सेरेब्रल पाल्सी दिना निमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध थेरपी व विशेष शिक्षणाची व्यवस्था संवेदना प्रकल्पामध्ये पाहून मला आनंद वाटला. शाळेच्या नावासारखे संवेदनशील कार्य या ठिकाणी चालते ,अशी भावना डॉ. सोनाली नागठाणे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे कोषाध्यक्ष श्री. प्र.मा.जोशी सर आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपाताई पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिजिओथेरपीस्ट डॉ. मयुरी बिल्लावार तर विशेष शिक्षिका सौ. जयश्री माने यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सांगता शांती मंत्राने झाली.