जागतिक ऑटीझम दिनानिमित्त दिव्यांगत्व तपासणी शिबिरांचे आयोजन करावे - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
जागतिक ऑटीझम दिनानिमित्त दिव्यांगत्व तपासणी शिबिरांचे आयोजन करावे - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व्यवस्थापन समितीचा सभा
लातूर, दि. 24 (जिमाका) : जागतिक ऑटीझम दिनानिमित्त 2 एप्रिल रोजी जिल्ह्यात दिव्यांगत्व तपासणी शिबिराचे आयोजन करावे. तसेच गरजूंना औषधी, उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या जिल्हा व्यवस्थापन समितीच्या सभेत ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जाधव, जनकल्याण समिती संवेदना प्रकल्पाचे सुरेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, उमंग प्रकल्पाचे डॉ. संतोष उटगे, जिल्हा रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
दिव्यांगत्व निदानासाठी जागतिक ऑटीझम दिनानिमित्त विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन करावे. यामध्ये फिट येण्यासारख्या आजाराच्या रुग्णांना जिल्हा परिषदेमार्फत औषधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे सर्वेक्षण करण्यासाठी लवकरच मोहीम राबविली जाणार असून यासाठी जिल्ह्यातील सर्वेक्षकांचे तालुकानिहाय प्रशिक्षण आयोजन करून माहिती संकलानाबाबत मार्गदर्शन करावे. या सर्वेक्षणाचे वेळापत्रक व पूर्वतयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी दिल्या. दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड देण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. नाईकवाडी यांनी दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा परिषदेच्या पाच टक्के निधीतून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.