कलाविष्कार दिव्यांगाचा संस्कार भारती लातूर व संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु), यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांचे नृत्य, योग प्रात्यक्षिक, देशभक्ती गीतावरील विद्यार्थ्यांचे सादरीकरण उत्कृष्ठ झाले. संस्कार भारतीच्या टीमने बहारदार गाणी सादर केल्यामुळे , दिव्यांग मुले व त्यांचे पालक आनंदी झाले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून सह्याद्री परिवारचे सर्व सदस्य बैठकीच्या निमित्ताने आले होते. चि. प्रणय पुरुषोत्तम बुर्डे( डाऊन सिंड्रोम), यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाल्यामुळे या कार्यक्रमात त्याला सन्मानित करण्यात आले. चि. प्रणव बुर्डे बोरवली येथे असतो. 2007 ते 2020 पर्यंत "द-लीला "या पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करीत होता. या हॉटेल मध्ये 1400 कर्मचाऱ्यापैकी प्रणय हा एकमेव दिव्यांग कर्मचारी होता. सर्वसमावेशक रोजगाराचे उत्तम उदाहरण आहे. प्रणय बुर्डे चा प्रवास अनोखा व कौतुकास्पद आहे. स्वतःच्या हक्कासाठी तसेच डाऊन सिंड्रोम व बौद्धिक दिव्यांग असलेल्या इतर व्यक्तीसाठी संघर्ष करण्याचे कौशल्य व क्षमता असल्यामुळे 2014 साली सर्वोत्कृष्ट व कार्यक्षम कर्मचारी म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2017 साली एक आदर्श व्यक्ती (रोल मॉडेल) म्हणून त्याच्या कामगिरीची सार्वजनिक ओळख म्हणून त्याला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. हे दोन्ही पुरस्कार जागतिक दिव्यांग दिनी" 3 "डिसेंबरला आपल्या देशाच्या महामहीम राष्ट्रपतींनी प्रदान केले आहेत. जागतिक डाऊन सिंड्रोम 2014 साली डाऊन सिंड्रोम इंटरनॅशनल (DSI) द्वारे डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींचे , जीवन बळकट आणि समृद्ध करण्यासाठी व त्यांच्या हक्कासाठी बळ दिल्याबद्दल आणि बौद्धिक दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्याची वकालत केल्याबद्दल 2015 मध्ये चेन्नई येथे झालेल्या 12 व्या "जागतिक डाऊन सिंड्रोम" परिषदेमध्ये प्रणयला पुरस्कार देण्यात आला. 2018 मध्ये काठमांडू, नेपाळ येथे जागतिक समावेशित परिषदेने ‘सेल्फ अॅडव्होकसी” प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला होता हे प्रशिक्षण आशिया खंडातील संपूर्ण देशाचे होते. स्व अधिवक्ता व त्यांचे मार्गदर्शक यांच्या साठी हे प्रशिक्षण योजले होते. जून 2018 मध्ये “बर्मिंगहम” येथे आयोजित 17 व्या जागतिक परिषदेत सहभाग होण्यासाठी प्रणयला आमंत्रित केले होते. जिथे त्यांने जगभरातील मान्यवर आणि स्व.अधिवक्ता यांच्याशी संवाद साधून ,आपली उपस्थिती दर्शवली होती. प्रणय स्पेशल ऑलिंपिक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, रोलर स्केटिंग मधील विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक जिंकलेला आहे. प्रणय संगणक जाणकार आहे. टायपिंग, फॉरमॅटींग, ईमेल करतो. प्रणय फेसबुकवर आहे. त्याच्याकडे स्मार्टफोन आहे आणि तो सहज वापरतो. अशा यशस्वी कर्तुत्वान दिव्यांग व्यक्तीचा गौरव याप्रसंगी करण्यात आला. प्रणय सोबत त्याचे आई-बाबा यांचाही सन्मान “संवेदना” प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील व कमांडर श्री. श्रीरंगजी बिजूर यांच्या हस्ते करण्यात आला. संस्कार भारती, लातूर शाखेच्या ज्या कलाकारांनी सेवा दिली त्यामध्ये प्रा. डॉ. देवेंद्र कुलकर्णी, श्री. शरद पाडे, श्री. कौस्तुभ जोशी, श्री. सोमनाथ पवार, श्री. धन्वंतर देशपांडे, श्री अक्षय कुलकर्णी, श्री. जनार्दन तळीखेडे यांनी सूत्रसंचालन केले. दिव्यांग विद्यार्थ्यांनी जे नृत्य, गीत सादर केले त्याची पूर्वतयारी सौ जयश्री माने(विशेष शिक्षिका) कु. प्रणिता शिरसागर(विशेष शिक्षिका)श्री. चन्नय्या स्वामी(योग शिक्षक) यांनी केली.या कार्यक्रमाचा समारोप परिवार संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर श्री श्रीरंगजी बिजूर यांनी केले.ते म्हणाले संवेदना केंद्र सेरेब्रल पाल्सी आणि बौद्धिक दिव्यांग या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे केंद्र आहे. या ठिकाणची भौतिक सुविधा, विविध थेरापि, शिक्षण योजनापुर्वक निर्माण केलेली आहे. या केंद्रावरती पालकांसाठी जे प्रशिक्षण दिले जाते ही बाब मला विशेष वाटली. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एक महत्वाचे, उपयुक्त" संवेदना केंद्र" निर्माण झाले आहे. संवेदना केंद्राच्या सर्व संचालकांचे मी हार्दिक
करतो व त्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी श्री. सुरेश पाटील (कार्यवाह) डॉ. योगेश निटूरकर(सहकार्यवाह), श्री. श्याम भराडिया(कोषाध्यक्ष), श्री. समीर मुलमुले(सदस्य), श्री. राहुल देशपांडे (सदस्य), प्रा. डॉ. प्रीती पोहेकर(सक्षम देवगिरी प्रांत महिला प्रभारी), डॉ. पाटील मॅडम(स्त्री रोग तज्ञ, योगिनी हॉस्पिटल) यांची उपस्थिती होती. श्री व्यंकट लामजने यांनी उपस्थितांचे आभार मानले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.