दिव्यांग व्यक्ती प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो – जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातूर
दिव्यांग व्यक्ती प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो – जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातूर
संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु), लातूर येथे आज दि. 27 जून 2019 रोजी हेलन केलर जयंतीच्या निमीत्ताने विशेष शिक्षक, पालक यांची विशेष मुलांचे व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संवेदना शाळेतील इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या चि. हिराचंद सूळ, चि. जहीद शेख, चि. निखील इंजे यांचा मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मा. जिल्हाधिकारी म्हणाले की, हेलन केलर च्या जीवनामध्ये चांगले शिक्षक मिळाले म्हणून आज संपुर्ण जगभर त्यांचे नाव झाले. स्वत दिव्यांग असून दिव्यांगांसाठी त्यानी प्रचंड काम केले. याच पद्धतीने दिव्यांगांसाठी चांगले शिक्षक, जागरुक पालक, दर्जेदार शाळा उपलब्ध झाल्या तर दिव्यांग व्यक्ती सुद्धा प्रशासकीय अधिकारी होऊ शकतात. आज या ठिकाणी सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांचे दहावी परीक्षेमधील गुण पाहूण मला आनंद वाटला. या कामासाठी पालकांनी व शिक्षकांनी मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो. प्रकल्प अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी स्वागत केले. संवेदना प्रकल्पासाठी श्री. सर्वोत्तम कुलकर्णी यांनी मुलांच्या भोजनासाठी साहित्य दिल्यामुळे त्यांचा सत्कार मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यशाळेत नागपूर विभागीय केंद्राचे ऑक्युपेशनल थेरपीस्ट व स्पीच थेरपीस्ट, प्रा.डॉ. रमेशराव जोशी, श्री. भारत कांबळे यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. स्वाती तेलंग, प्रास्ताविक डॉ. मयुरी बिल्लावार व आभार श्री. व्यंकट लामजणे यांनी मानले. या कार्यशाळेस सर्व शिक्षा अभियान मधील विशेष शिक्षकांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेपुर्वी लातूर जिल्हा स्थानिक स्तर समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संवेदना शाळेत संपन्न झाली. या बैठकीला न्यायाधीश श्रीमती एस.डी. कंकनवाडी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव, अँड. संतोष देशपांडे, जिल्हा सरकारी वकील, डॉ.महादेव शिंदे, अधीक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, डॉ. धनगे मँडम, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, श्री. शिवानंद मिनगीरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, श्री. जवळेकर साहेब, पोलीस उपाधीक्षक, श्री. बसवराज पैके, सदस्य, श्री. वाकडे यांनी सहभाग घेतला.