जागतिक दिव्यांग दिन समारंभ शनिवार दि. 3 डिसेंबर 2022
जागतिक दिव्यांग दिन समारंभ शनिवार दि. 3 डिसेंबर 2022
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन समारंभ शनिवार दि. 3 डिसेंबर 2022 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 3 श्रेणीमध्ये संवेदना प्रकल्पाच्या वतीने पुरस्कार देण्यात आला. 1) प्रतिथयश दिव्यांग व्यक्ती श्री. अमोल सुरेश सगर – लातूर, M Pharmcy, यश डिस्ट्रीब्युटर्स 2) प्रशासकीय सेवेत दिव्यांगांसाठी शासकीय योजनेचे प्रभावीपणे कार्य करणारे श्री. नरसिंग गुंडाप्पा राजनाळे, कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती, लातूर या पदावर काम करणारे कर्मचारी आणि 3) संस्था श्रेणीत उदयगीरी नेत्र रुग्णालय या तिघांना मा. जिल्हाधिकारी श्री. पृथ्वीराज बी. पी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिनव गोयल, रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ.राजेश पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, रु. 5000 चा धनाकर्ष, पुस्तक, पुष्पगुच्छ असे होते.
पुरस्कार प्राप्त श्री. अमोल सुरेश सगर यांनी आपली भावना व्यक्त करीत असताना म्हणाले की, संवेदना प्रकल्पाचा पुरस्कार प्राप्त झाल्याने आनंदी झालो आहे. या कार्यक्रमासाठी माझे संपुर्ण कुटुंब उपस्थित आहे. माझी आज्जी या ठिकाणी आलेली आहे जिचे वय 100 वर्ष आहे. मी दिव्यांग असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
जनकल्याण निवासी विद्यालय येथे माझे शालेय शिक्षण झाले. या विद्यालयातील शिक्षण व संस्कारामुळे संकटावर मात करण्याची जिद्द निर्माण झाली. या जिद्दीमुळे मी एक यशस्वी व्यावसायिक म्हणून आज जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी आपल्यासमोर पुरस्कार स्वीकारला आहे.
संस्था श्रेणीतील पुरस्कार उदयगिरी लायन्स चँरीटेबल आय हॉस्पीटल, उदगीर या संस्थेस मिळाला. या रुग्णालयाच्या वतीने आजतागायत 156411 मोतीबिंदू शस्रक्रिया, 3662 तपासणी शिबीर, कॉर्निअल ब्लाईंडनेस संबंधीत ची शस्रक्रिया हे वैशिष्ट्ये या संस्थेची आहेत. सर्व पुरस्कारार्थीचे
अभिनंदन
आणि आभार.
या कार्यक्रमात आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे लातूर जिल्ह्यातील दिव्यांग शाळातील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा झाल्या. सर्व प्रवर्गातील दिव्यांगांनी सहभाग घेतला होता. केवळ सहभाग नव्हे, दर्जेदार कला सादर करण्यात आली. या कलेतून समाजाला दाखवून दिले की, शरीराने दिव्यांग असेल, पण अभिनय, नृत्य, गायन, वादन, समुह नृत्य, तालासोबत सांघीक सादरीकरण करण्यामध्ये तसूभरही मागे नाही. दृष्टीबाधीतांचे भजन, कर्णबधीर विद्यार्थ्यांनी अभिनय, सेरेब्रल पाल्सी व बौद्धीक दिव्यांग विद्यार्थ्यांचे नृत्य अचंबित करण्यासारखे होते. मानावं लागेल त्या शिक्षकांना ! खुप मेहनत पालकांनी व शिक्षकांनी घेतली होती. सर्व शिक्षक, स्पर्धेत सहभागी सर्व दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे मन:पूर्वक
अभिनंदन
!
दिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धा म्हणजे वेगळा अनुभव असतो. प्रत्यक्ष पहायला पाहिजे. या ठिकाणी पारितोषिकापेक्षा कला सादरीकरणाकडे लक्ष असते. माझी कला कोणी तरी पाहत आहे, ती दर्जेदार व्हायला हवी ही भावना दिव्यांग बालकांकडे असते. या स्पर्धेमध्ये निखळता जाणवते, गरज असते सहानुभुतीच्या डोळ्यांची, गरज असते आपुलकी, प्रेमाची, गरज असते आपलेपणाची, हे साधण्यासाठी निरपेक्ष वृत्तीची....
समाजकल्याण विभाग जि.प लातूर आणि विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी श्री. संतोष नाईकवाडी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डीडीआरसी स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्यवाह डॉ. योगेश निटुरकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. दिपक क्षीरसागर व माधुरी वळसे यांनी केले.